फलटण तालुक्यात गॅस टंचाईचा भडका! नागरिकांचा मोकळ्या सिलेंडरसह तहसील कार्यालयावर मोर्चा!

राजकारण मीडिया:फलटण : दिनांक:११/०४/२०२६: प्रभाकर करचे: फलटण तालुक्यातील गॅस टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून संतप्त नागरिकांनी अखेर थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. हातात मोकळ्या गॅस सिलेंडर टाक्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी निदर्शने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक नागरिकांनी गॅसचे नियमित बुकिंग केले होते. बुकिंगनंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी येऊनही प्रत्यक्षात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी गॅस एजन्सीमध्ये चौकशीसाठी धाव घेतली असता, “उद्या या” असे सांगून त्यांना परत पाठवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, एजन्सी कार्यालयात गेलेल्या नागरिकांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परिस्थिती आणखी चिघळली. त्यातच संबंधित गॅस एजन्सीचे कर्मचारी अचानक गोडाऊन बंद करून निघून गेल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. यानंतर नागरिकांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारत मोकळ्या गॅस टाक्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

मोर्चादरम्यान “गॅस द्या, नाहीतर उत्तर द्या” अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला. घरगुती वापरासाठी गॅस नसल्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याची व्यथा अनेकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. नागरिकांना वेळेत गॅस पुरवठा करण्यात यावा, तसेच संबंधित एजन्सीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

फलटण तालुक्यातील ही परिस्थिती लक्षात घेता गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्या असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!