राजकारण मीडिया:फलटण | दि. 10 एप्रिल 2026 | प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील ढवळपाटी, वाखरी परिसरात एका 18 वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी चार जणांविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना 10 एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारास घडली असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृत युवक सोमनाथ संदीप जाधव (वय 18, रा. दऱ्याचीवाडी, ता. फलटण) हा एका मुलीसोबत मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून संतापलेल्या आरोपींनी संगनमताने सोमनाथ यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली.
आरोपी आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे व पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांनी संबंधित युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचे वडील संदीप उमाजी जाधव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा (C.R. No. 190/2026) दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे
