राजकारण मीडिया:बारामती : दिनांक १२/०३/२०२६: प्रभाकर करचे:बारामतीत जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ निर्णय देण्याची परंपरा जपणारा “जनता दरबार” पुन्हा एकदा भरत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरू केलेली ही लोकसेवेची पद्धत आता त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे चालवत आहेत.
बारामतीत उद्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना आपल्या तक्रारी व समस्या थेट मांडण्याची संधी मिळणार आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रश्न सोडवण्याची पद्धत कायम ठेवली जाणार आहे.
अजित पवार यांनी बारामतीत जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी “जनता दरबार” ही परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतरही ही लोकाभिमुख परंपरा थांबणार नसल्याचे स्पष्ट करत सुनेत्रा पवार स्वतः पुढाकार घेत आहेत. त्यामुळे बारामतीकरांमध्येही उत्सुकता आणि अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
या जनता दरबारात नागरिकांच्या विविध शासकीय समस्या, विकासकामे, स्थानिक अडचणी तसेच वैयक्तिक तक्रारी ऐकून त्यावर तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे बारामतीसह परिसरातील अनेक नागरिक उद्याच्या या दरबाराकडे लक्ष लावून आहेत.
✔️ विशेष म्हणजे, अजितदादांच्या कार्यपद्धतीची झलक देत लोकांशी थेट संवाद साधण्याचा हा प्रयत्न असल्याने राजकीय वर्तुळातही या दरबाराची चर्चा रंगली आहे.
