राजकारण मीडिया न्यूज | फलटण/बारामती | दि. १२ मार्च २०२६: प्रभाकर करचे:बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रात मोठे महत्त्व असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदावर अखेर सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारत कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी केवळ सुनेत्रा पवार यांचेच नामांकन दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. या निर्णयामुळे बारामतीतील सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी जोडलेला महत्त्वाचा उद्योग मानला जातो. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड ही नेहमीच राजकीयदृष्ट्या आणि सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जाते.
संचालक मंडळातील सदस्यांनी कारखान्याच्या कामकाजात सातत्य राहावे आणि आधुनिकीकरणाच्या योजना गतीने राबवाव्यात, या उद्देशाने सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत कारखान्याच्या नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची आर्थिक घडी अधिक मजबूत करणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यावर भर दिला जाणार असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
थोडक्यात :अजितदादांच्या सहकार वारशाला पुढे नेत माळेगाव साखर कारखान्यावर आता “सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व” अधिकृतपणे स्थिर झाले आहे.
