राजकारण मीडिया | फलटण | दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ | प्रतिनिधी : प्रभाकर करचेप्रेमसंबंधाचा बहाणा करून हॉटेल व्यवसायिकाला जाळ्यात ओढत खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा कट रचणाऱ्या सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन अनोळखी पुरुष आरोपी व एका महिलेचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
फिर्यादी आनंद काशिनाथ दळवी (रा. कापूरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एका महिलेने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधून जवळीक निर्माण केली. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता बुधवार पेठ, फलटण येथील फ्लॅटवर बोलावून नेण्यात आले. तेथे आरोपींनी पूर्वनियोजित कट रचत दळवी यांना खोट्या बलात्कार गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली आणि ४० लाख रुपयांची मागणी केली.
आरोपी साहिल तारे, वैभव सस्ते, रोहन काकडे, विनायक जाधव व राजू बोके तसेच दोन अनोळखी इसम व एका महिलेने संगनमताने फिर्यादीकडून जबरदस्तीने रोख, एटीएम व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एकूण १ लाख ९५ हजार रुपये उकळले. त्यानंतर पुणे रस्त्याने सोडण्याचा बहाणा करत असताना दोन अनोळखी आरोपींनी वाहन अडवून मारहाण केली व अंदाजे २० तोळे वजनाची सुमारे ३० लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून घेतली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथके स्थापन करून कारवाई केली असता वरील पाच आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत असून फरार आरोपी व चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
पोलिसांच्या जलद आणि समन्वित कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या या खंडणीप्रकरणाचा अल्पावधीत उलगडा झाला असून गुन्हेगारीविरोधातील पोलिसांच्या तत्परतेचे उदाहरण म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे.
