राजकारण मीडिया: फलटण :दिनांक:१४/०२/२०२६:फलटण शहराच्या न्यायिक इतिहासात नवा टप्पा गाठत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या अत्याधुनिक न्यायालयाचे उद्घाटन उद्या (१५ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११.३० वाजता होणार असून न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणाचा हा महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. उद्घाटन समारंभ माननीय न्यायमूर्ती नितीन आर. बोरकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास न्यायमूर्ती अनिल पानसरे, संजय देशमुख, रणजितसिंह भोसले, तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा अरविंद वाघमारे आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश फलटण राजेंद्र पाटील भोसले यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे चेअरमन हर्षद निंबाळकर, सदस्य विठ्ठलराव कोंडे देशमुख आणि वसंतराव भोसले यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.
उद्घाटनाचा प्रारंभिक कार्यक्रम फलटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय (विमानतळ कोर्ट) येथे होणार असून त्यानंतरचा मुख्य सोहळा सजाई गार्डन मंगल कार्यालय, विंचुर्णी रोड येथे पार पडणार आहे.
फलटण वकील संघाच्या अध्यक्ष व कार्यकारिणीने सर्व मान्यवर, वकील, नागरिक आणि न्यायप्रेमींना या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक पातळीवर न्यायसेवा अधिक सक्षम, जलद व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने हे न्यायालय महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे मत कायदे वर्तुळातून व्यक्त होत आहे.
