चोरांच्या मुसक्या आवळल्या; चोरीचे सोने आणि विहिरीतील मोटारी मालकांच्या स्वाधीन!

फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; वेगवान तपासामुळे फिर्यादींना दिलासा

राजकारण मीडिया:फलटण: दिनांक:01/09/2026:प्रभाकर करचे | गुन्हा दाखल झाला की तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरट्यांचा माग काढायचा आणि चोरीचा मुद्देमाल पुन्हा मालकाच्या ताब्यात द्यायचा, असा धडाकेबाज संदेश फलटण ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. साखरवाडी येथून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तसेच विडणी परिसरातील विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत करून संबंधित फिर्यादींना परत करण्यात आल्या आहेत.

साखरवाडी येथील फिर्यादी बाळासाहेब आबासाहेब चव्हाण यांच्या घरातून काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तपासातून आरोपीचा शोध घेत चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

त्याचप्रमाणे दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात विडणी येथील फिर्यादी तुषार अभंग आणि संतोष जगताप यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माग काढत चोरीस गेलेल्या मोटारी जप्त केल्या.

“वेळेत तपास… आणि चोरीचा माल परत!”

प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांच्या उपस्थितीत चोरीचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला. चोरीचा माल पुन्हा मिळाल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक करत “वेळेत तपास करून आमचे सोने आणि मोटारी परत मिळवून दिल्या,” अशी भावना व्यक्त केली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार करण्यात आली.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, तसेच पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, सचिन वावरे आणि हनुमंत दडस यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

चोरांसाठी इशारा, नागरिकांसाठी विश्वास!

“चोरी करून पळालात तरी पोलिसांच्या तपासातून सुटका नाही!” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून फलटण ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबरोबरच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात यश मिळाल्याने फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

— फलटण ग्रामीण पोलिसांची वेगवान कारवाई; चोरट्यांना दणका, फिर्यादींना दिलासा!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!