दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; दोन संशयितांना शिताफीने पकडले, मुद्देमाल जप्त
राजकारण मीडिया:फलटण:दिनांक : 09/08/2026: प्रभाकर करचे : फलटण ग्रामीण भागात नागरिकांना अडवून लुटण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या टोळीच्या मनसुब्यांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाणी फेरले. मांडवखडक, ता. फलटण येथील हॉटेल वाणगंगा परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले, तर अन्य दोघे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवखडक गावच्या हद्दीत हॉटेल वाणगंगा परिसरातील इसम रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना लुटणार असल्याची गोपनीय माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाईचा आराखडा आखला.
गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी दाखल होताच चार संशयित पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी सुमारे दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्यातील दोघांना ऊसाच्या शेतातून व कुरवलीच्या तलावाजवळून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी राहुल नाना घुले (रा. इंदिरानगर, फलटण) आणि नंदकुमार भागोजी सोनवणे (रा. झिरपवाडी, ता. फलटण) यांना अटक केली असून, त्यांचे अन्य दोन साथीदार पसार झाले आहेत. नागरिकांना लुटण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310(8)(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या टोळीचा पूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास आता सुरू आहे.
पोलिसांच्या ‘ऑपरेशन’मुळे संभाव्य दरोडा टळला!
पोलिसांच्या सतर्कतेमुळे नागरिकांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांचा डाव वेळीच उधळला गेला. गोपनीय माहितीवर तातडीने हालचाल, संशयितांचा थरारक पाठलाग आणि अखेर दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याने फलटण ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कारवाईत सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत सुननावळ, पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, सुभाष नलवडे यांनी सहभाग घेतला.
फलटण ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे संभाव्य लुटीचा डाव उधळला गेला असून, पसार आरोपींच्या अटकेनंतर या टोळीचे आणखी किती कारनामे उघडकीस येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
— राजकारण मीडिया, फलटण
