गोठ्यात जनावरे नाहीत; तरीही सुरू होता कृत्रिम दूधनिर्मितीचा उद्योग!फलटण तालुक्यातील होळ येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा, रसायने व साहित्य जप्त

राजकारण मीडिया:फलटण:दि. १३/०७/२०२६: प्रभाकर करचे : नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर सुरू केलेल्या विशेष मोहिमेत फलटण तालुक्यात मोठी कारवाई उघडकीस आली आहे. तालुक्यातील होळ येथील एका गोठ्यात कोणतीही गाय किंवा म्हैस नसतानाही रासायनिक मिश्रणाच्या साहाय्याने कृत्रिम दूध तयार करून त्याचा पुरवठा केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव छाप्यामध्ये समोर आले.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दूध भेसळखोरांविरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू असून, त्याच अनुषंगाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने संबंधित ठिकाणी संयुक्त छापा टाकला.

छाप्यादरम्यान गोठ्याची तपासणी केली असता तेथे एकही दुभते जनावर नसल्याचे आढळले. मात्र, विविध रासायनिक पदार्थ, संशयास्पद पावडरी आणि पाण्याचे मिश्रण करून नैसर्गिक दुधासारखे दिसणारे कृत्रिम दूध तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. या ठिकाणी दररोज सुमारे ३० ते ३५ लिटर कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.

कारवाईदरम्यान बनावट दूधनिर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने, रासायनिक पावडरी, मिश्रणासाठीचे साहित्य तसेच अन्य संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त साहित्याचे नमुने अधिक तपासासाठी अधिकृत प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

प्राथमिक चौकशीत या ठिकाणी तयार होणारे कृत्रिम दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील एका डेअरीकडे पुरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दूध तयार करण्यासाठी लागणारी विशिष्ट पावडर नीरा परिसरातील एका व्यक्तीकडून मागवली जात असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण पुरवठा साखळीत आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

या प्रकरणी संबंधित पाच संशयितांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच लागू असलेल्या इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाकडून संयुक्तपणे सुरू आहे.

दरम्यान, या धडक कारवाईनंतर सातारा जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रे आणि संबंधित व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अशाच प्रकारच्या व्यापक आणि सातत्यपूर्ण कारवाया राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!