आषाढी वारीत दुर्दैवी दुर्घटना; भरधाव ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिला वारकरी ठार, ४ गंभीर जखमी

राजकारण मीडिया :जेजुरी: दि. १३ जुलै२०२६: प्रभाकर करचे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीच्या उत्साहाला सोमवारी काळी किनार लाभली. सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळील भोंगळे मळा परिसरात भरधाव ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सासवड-जेजुरी रस्त्यावरील हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर ही दुर्घटना घडली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांचा समूह मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की तीन महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या.

जखमींना स्थानिक नागरिक, स्वयंसेवक व पोलिसांच्या मदतीने तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत व जखमी महिला वारकरी या सांगली जिल्ह्यातील कसबेडिग्रज येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात संबंधित ट्रक (एमएच-४३ ई-४९०८) हा एका दिंडीसोबत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहन चालकास अचानक अस्वस्थता किंवा ग्लानी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता तपासली जात आहे. अपघातानंतर जेजुरी पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन तसेच पालखी सोहळा समन्वय यंत्रणेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा, साक्षीदारांचे जबाब व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून संबंधित वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मनुष्यहानी घडविल्याप्रकरणी कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेमुळे काही काळ सासवड-जेजुरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, आषाढी वारीसारख्या लाखो भाविकांच्या उपस्थितीतील धार्मिक सोहळ्यांमध्ये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी नियोजन व कठोर वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!