फलटण पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! फायरिंग प्रकरणातील दोन अल्पवयीन संशयित जेरबंद!

राजकारण मीडिया | फलटण | दिनांक ०९/०५/२०२६: प्रभाकर करचे:फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या फायरिंग प्रकरणातील फरार अल्पवयीन संशयितांना अखेर फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात निर्माण झालेली भीती कमी झाली असून पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक ७ मे २०२६ रोजी खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र ढाबा परिसरात झालेल्या वादातून फायरिंगची घटना घडली होती. या घटनेत आरोपींनी पिस्तुलातून गोळीबार करत दहशत निर्माण केली होती. त्यानंतर संबंधितांवर शस्त्र अधिनियमासह विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र घटनेनंतर दोन अल्पवयीन संशयित फरार झाले होते.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना फलटण ग्रामीण पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून तांत्रिक माहिती व गोपनीय नेटवर्कच्या आधारे संशयितांचा शोध सुरू ठेवला. अखेर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना खंडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईमुळे ग्रामीण भागात वाढणाऱ्या बेकायदेशीर शस्त्रांच्या वापरावर पोलिसांनी कठोर संदेश दिल्याची चर्चा सुरू आहे. “कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही,” हे पुन्हा एकदा फलटण ग्रामीण पोलिसांनी दाखवून दिल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

ही कारवाई मा. निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, स . पो.नि. सुबनावळ,डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पो.उप-निरीक्षक शिवानी नागवडे तसेच नितीन चतुरे, महादेव पिसे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, हनुमंत दडस, सुरज काकडे, श्रीकांत खरात, अमोल देशमुख यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!