सातारा / फलटण, दि. ८ मार्च २०२६ (राजकारण मीडिया) – प्रतिनिधी भैय्या खिलारे :आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सातारा शहर पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचा सन्मान करून महिला शक्तीचा गौरव करण्यात आला. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या हस्ते महिला पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान महिला पोलिसांनी पारंपरिक भगवे फेटे परिधान करून उपस्थिती लावत महिला दिनाचा उत्साह द्विगुणित केला. कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि समाजसेवेच्या भावनेने पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिला पोलिसांच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी महिला पोलिसांना शुभेच्छा देताना सांगितले की, महिला पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत समाजात विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या परिश्रमामुळे पोलीस दलाची ताकद अधिक वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमामुळे महिला पोलिसांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे हा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
