राजकारण मीडिया | फलटण:दिनांक : 24 फेब्रुवारी 2026: प्रभाकर करचे:फलटण शहरातील गजबजलेल्या परिसरात केवळ “गाडी वेगात चालवू नका” अशी समज दिल्याच्या किरकोळ कारणावरून दोन सख्ख्या भावांवर सत्तूर व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे यांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंभीर जखमी झालेल्या भावांची नावे अनिल विठ्ठल हिरणवाळे व संतोष हिरणवाळे (दोघेही रा. ब्राह्मण गल्ली, फलटण) अशी आहेत.
अशी घडली थरारक घटना
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 22 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास अनिल हिरणवाळे हे आपले गॅरेज बंद करून बाहेर उभे होते. त्यावेळी गोसावी वस्तीतून सात ते आठ तरुण मोठ्या आवाजात आणि वेगाने दुचाकी चालवत त्यांच्या गॅरेजसमोरून गेले.
एखाद्या निष्पाप नागरिकाला अपघात होऊ नये या हेतूने “गाडी इतक्या वेगात चालवू नका, कोणाला धक्का लागेल,” अशी समज अनिल यांनी त्या तरुणांना दिली. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित टोळी काही वेळाने परत आली.
त्यानंतर अनिल व त्यांचा भाऊ संतोष यांच्यावर लाकडी दांडक्यांनी, हाताने तसेच लोखंडी सत्तूरने सपासप वार करण्यात आले. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांची झडती; दोन आरोपी जेरबंद
घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. विविध मंडळे व सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फलटण शहर पोलीस ठाणे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. तपासादरम्यान पुढील दोघांना अटक करण्यात आली आहे .
1. संदीप विठ्ठल जाधव (वय 20, रा. स्वामी समर्थ मंदिराजवळ, मलठण ता. फलटण)
2. सुनील उर्फ सतीश राजू मोरे (वय 20, रा. कुंभार भट्टी, मलठण ता. फलटण)
अटक आरोपींना दि. 24 फेब्रुवारी रोजी फलटण येथील माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
इतर फरार आरोपींचा शोध सुरू
या गुन्ह्यातील काही संशयित अद्याप फरार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करीत आहेत.
दरम्यान, किरकोळ कारणावरून घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
