राजकारण मीडिया: दिनांक २८/१२/२०२५: प्रभाकर करचे:फलटण नगरपालिका निवडणुकीत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला, तरी हा पराभव साधा नसून तो राजकीय दृष्ट्या अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. चक्रव्यूहात उतरलेला अभिमन्यू जरी या लढाईत अपयशी ठरला, तरी त्याने मिळवलेली मते आणि शहरातील बदललेली मतदानाची रेषा ही आगामी लोकसभा–विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी गटाला विचार करायला लावणारी आहे.
मराठा कार्ड आणि दुरावलेला बहुजन समाज
राजे गटाने निवडणुकीत मराठा कार्ड चालवण्याचा केलेला प्रयत्न अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. उलट या भूमिकेमुळे बहुजन समाजाचा मोठा घटक दुरावला. फलटणसारख्या सामाजिकदृष्ट्या मिश्र शहरात केवळ एका समाजावर केंद्रित राजकारण हे घातक ठरते, याचा अनुभव या निवडणुकीत पुन्हा एकदा आला.
‘चांडाळ चौकडी’ भोवती फिरणारे राजकारण
रामराजे, संजीवराजे आणि रघुनाथराजे यांच्या अवतीभवती सतत फिरणाऱ्या तथाकथित ‘चांडाळ चौकडी’ने राजकारणावर पकड ठेवली.दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना वेळ न देणे, थेट भेट नाकारून मध्यस्थ म्हणून पहिल्या फळीतील लोकांचा वापर करणे, आणि निर्णय प्रक्रियेत मोजक्यांनाच सामावून घेणे – या सगळ्याचा फटका थेट निवडणूक निकालावर बसला. कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि तुटलेली साखळी ही राजेंच्या पराभवाची महत्त्वाची कारणे ठरली.
सूक्ष्म नियोजनाचा आणि रणनीतीचा अभाव
निवडणूक म्हणजे केवळ प्रतिष्ठेची लढाई नसून ती सूक्ष्म नियोजन, बूथनिहाय रणनीती आणि सामाजिक समीकरणांचा अचूक अभ्यास मागते. या बाबतीत राजे गट कमी पडला. प्रतिस्पर्धी गटाने जमिनीवर उतरून आखलेले नियोजन, कार्यकर्त्यांचा वापर आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती अधिक प्रभावी ठरली.
पराभवातही लपलेली मोठी राजकीय चेतावणी
तरीही, अनिकेत राजेंनी मिळवलेली मते ही माजी खासदार गटासाठी धोक्याची घंटा आहेत. नगरपालिका निवडणुकीत पराभव झाला असला, तरी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत फलटण शहरात विरोधी माजी खासदार गटाच्या मतदानात घट झाल्याचे स्पष्ट दिसते.
याचा अर्थ असा की रामराजेंना मानणारा आणि राजे घराण्याशी निष्ठा ठेवणारा मतदार वर्ग आजही फलटण शहरात अस्तित्वात आहे. योग्य नेतृत्व, सर्वसमावेशक भूमिका आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेणारी रणनीती आखली, तर हाच मतदार वर्ग भविष्यात निर्णायक ठरू शकतो.
निष्कर्ष :फलटण नगरपालिका निवडणूक ही राजे गटासाठी पराभवाची जखम असली, तरी तीच जखम आत्मपरीक्षणाची संधीही आहे. चक्रव्यूहात अपयश आले असले, तरी युद्ध संपलेले नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत फलटण शहरातील हीच सुप्त ताकद जागी झाली, तर राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात – आणि हीच बाब सत्ताधारी गटाला अस्वस्थ करणारी आहे.
