
सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे
कोल्हापूर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवून चार चाकी वाहनधारकाला लुटणाऱ्या एका अट्टल चोरट्यास महात्मा गांधी पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने जेरबंद केले आहे.
त्याच्याकडून लुटीचा ३९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्य दोन संशयित फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके खाना करण्यात आली आहेत. ही माहिती महात्मा गांधी पोलिस ठाणे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.अटक केलेल्यात सुमित शत्रुघ्न काळे (वय १९, रा. माजी सैनिक वसाहत, मिरज, जि. सांगली) याचा समावेश आहे, तर जितू चव्हाण (रा. पारधी वस्ती) व अन्य एक संशयित हे दोघेही फरारी झाले आहेत.
याप्रकरणी नारायण माळी यांनी महात्मा गांधी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखलकेली होती.संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडील पोलिस उपनिरीक्षक संदीप गुरव व धनंजय चव्हाण, पोलिस हवालदार सूरज पाटील, अभिजीत धनगर, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण व बसवराज कुंदगोळ यांच्या पोलिस पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजाविली. गत डिसेंबर महिन्यात कोल्हापूर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुनवाड फाटा पूल उतरुन कृष्णा घाटपरिसराकडे येणाऱ्या रस्त्यावर एका चार चाकी वाहनधारकास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गासह या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर व मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी संदीप शिंदे यांना विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार संदीप शिंदे यांनी महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडील एक पोलिसपथक कार्यस्त केले होते.याचवेळी या पोलिस पथकातील जावेद शेख व मोहसिन टिनमेकर यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारामार्फत वरील गुन्ह्यातील एक संशयित लुटीचा मुद्देमाल विक्री करण्यासाठी मिरज येथील हॉटेल नशेमन परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे या पोलिस पथकाने संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी या परिसरात संशयास्पदरित्या फिरणान्या सुमित काळे याला या पोलिस पथकाने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता लुटीचा मुद्देमाल मिळून आला. सुमित काळे याने आपल्या अन्य दोन साथीदार यांच्यासमवेत वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून लुटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील अधिक पोलिस तपास संदीप गुरव करीत आहेत.
