“२३ एकर समाजाची ! नाही कुणाच्या बापाची !” – जेजुरीत लोणारी समाजाचा विराट एल्गार! ट्रस्ट बदलाचा एकमुखी ठराव!

राजकारण मीडिया:जेजुरी, दि. २६ जून : प्रभाकर करचे: लोणारी समाजाच्या मालकीच्या २३ एकर जागेच्या संरक्षणासाठी जेजुरी येथे अखिल लोणारी समाज सेवा संघटनेच्या वतीने २५ जून रोजी काढण्यात आलेल्या विराट समाजहित मोर्चाने संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे ८०० ते ९०० समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले. “लोणार बाबा की जय”, “जय लोणारी”, “रवींद्रभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी जेजुरी नगरी दुमदुमून गेली.

मोर्चाची सुरुवात कै. राधाबाई बाबाजी नरळे लोणारी ट्रस्टच्या मालकीच्या गट क्रमांक २०५, रि.स. नं. २०६ मधील २३ एकर जागेपासून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा अखिल भारतीय लोणारी समाज धर्मशाळेकडे नेण्यात आला. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

सभेत माजी आमदार रविंद्रभाऊ धंगेकर, डॉ. रामदास कुटे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी शिंदे, सुदर्शन घेरडे, आप्पा करचे, उमाजी नाना ढेंबरे, संदीप होळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

मोर्चाच्या ठिकाणी उभारलेल्या फलकावर स्पष्ट करण्यात आले की, २३ एकर जागा ही लोणारी समाजाच्या मालकीची असून ती समाजहितासाठी राखीव आहे. समाजाच्या संमतीशिवाय या जागेची कोणतीही खरेदी-विक्री होऊ नये, असे आवाहन करण्यात आले.

सभेत काही विद्यमान ट्रस्टींकडून समाजाच्या मालकीच्या जागेच्या विक्रीचा प्रयत्न होत असल्याचा आरोप उपस्थितांकडून करण्यात आला. तसेच जेजुरी येथील धर्मशाळेच्या कारभारात पारदर्शकता नसल्याचा, धर्मशाळेच्या जागेवर गाळे उभारून त्यांचे भाडे वैयक्तिक स्वरूपात घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर उपस्थित समाजबांधवांनी विद्यमान ट्रस्टचा कारभार पारदर्शक नसल्याचे मत व्यक्त करत विद्यमान ट्रस्टी बरखास्त करून नव्या ट्रस्टची स्थापना करण्याचा एकमुखी ठराव मंजूर केल्याचा दावा करण्यात आला.

तसेच १८ वर्षांवरील प्रत्येक लोणारी समाजबांधवाला एक हजार रुपये सभासद शुल्क भरून ट्रस्टचा सभासद होता येईल, असा निर्णयही सभेत जाहीर करण्यात आला.

याशिवाय, २३ एकर समाजाची जागा कोणत्याही परिस्थितीत विकली जाऊ नये, ती भावी पिढ्यांसाठी आणि समाजकल्याणासाठी कायम राखण्यात यावी, असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. समाजाच्या नावावरील सव्वा पाच गुंठे जागेवर अत्याधुनिक व सुसज्ज धर्मशाळा उभारण्याची मागणीही जोरदारपणे करण्यात आली.

या आंदोलनात आमदार रविंद्रभाऊ धंगेकर आणि डॉ. रामदास कुटे यांनी समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत मार्गदर्शन केले. नाशिक येथून दिनकरभाऊ इंगळे, भिकाजी आढाव (मामा), संजयभाऊ कु-हे, रविभाऊ खांडेकर आणि सुभाष कु-हे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

मोर्चाचा समारोप समाजाच्या एकजुटीचा संदेश देणाऱ्या घोषणांनी झाला. उपस्थितांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली—

“समाजाची जागा, समाजाची मालकी; ती विकण्यासाठी नाही, तर समाजाच्या विकासासाठी आहे!”

“एकजूट – संघर्ष – समाजहित” या घोषणेसह समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी पुढील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!