फासाच्या सावलीत हरवतंय तरुणपण! उपजिल्हा रुग्णालयात आई-वडिलांचा आक्रोश !अन् पोलिस अधिकाऱ्याच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू!

राजकारण मीडिया फलटण | प्रभाकर करचे

अलीकडच्या काळात फाशी घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुण युवकांचे वाढते प्रमाण ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब ठरत आहे. विशेषतः 2026 मध्ये विविध कारणांमुळे जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेणाऱ्या युवकांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. नैराश्य, अपयशाची भीती, सहनशीलतेचा अभाव, कौटुंबिक संवादातील दरी, सामाजिक आणि आर्थिक ताणतणाव यामुळे अनेक तरुण मानसिकदृष्ट्या खचत असल्याची गंभीर वस्तुस्थिती या घटनांतून पुढे येत आहे.

उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात येणाऱ्या अशा युवकांच्या मृतदेहांपुढे आई-वडिलांचा होणारा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो. कालपर्यंत घरात हसणारे, खेळणारे आणि भविष्यातील स्वप्ने पाहणारे लेकरू अचानक कायमचे निघून गेल्याची जाणीव होताच पालकांचा बांध फुटतो. त्या वेदना शब्दांत व्यक्त करणे अशक्य ठरते.

अशाच एका घटनेत फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दुःखाने कोसळलेल्या कुटुंबीयांना धीर देताना एका पोलीस अधिकाऱ्यालाही स्वतःच्या भावना आवरता आल्या नाहीत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या या अधिकाऱ्याच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. दुःखाने व्याकुळ झालेल्या आई-वडिलांना आधार देत, त्यांना सांत्वन करताना त्या अधिकाऱ्याने दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी उपस्थितांच्या मनाला भिडली.

दरम्यान, वाढत्या आत्महत्यांच्या घटनांमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. युवकांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागृतीचा अभाव, मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते व्यसन, स्पर्धेचा ताण, अपेक्षांचे ओझे आणि कुटुंबातील संवाद कमी होणे याकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक आत्महत्येमागे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नसून संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या वर्तनातील बदल, एकटेपणा, चिडचिड, निराशा किंवा सतत तणावग्रस्त राहणे यांसारख्या लक्षणांकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. संवाद, विश्वास आणि भावनिक आधार हीच अशा घटनांना रोखण्याची प्रभावी साधने ठरू शकतात.

“क्षणिक नैराश्यामुळे घेतलेला निर्णय कायमचा असतो; पण मागे राहिलेल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू आयुष्यभर सुकत नाहीत,” हा संदेश प्रत्येक युवकापर्यंत पोहोचविण्याची आज नितांत आवश्यकता आहे.

— राजकारण मीडिया फलटण

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!