पालखी मार्गावरील धोकादायक पूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चर्चेत; नाना पाटील चौकाजवळील जीर्ण कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी!

राजकारण मीडिया फलटण | प्रभाकर करचे

फलटण शहरातील नाना पाटील चौकाजवळ नीरा उजवा कालव्यावरील पुलाचे संरक्षक कठडे अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी लाखो वारकरी, भाविक आणि नागरिक या मार्गाचा वापर करतात. यंदाही संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काही दिवसांत फलटण मुक्कामी दाखल होणार आहे. मात्र पालखी मार्गावरील या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पुलावरील अनेक ठिकाणचे संरक्षक कठडे तुटलेले, गंजलेले व कमकुवत झाले असल्याने मोठ्या गर्दीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. पालखी सोहळ्यादरम्यान हजारो वारकरी, दिंड्या, वाहने आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाकडून विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून पालखी सोहळ्यापूर्वी पुलावरील जीर्ण संरक्षक कठड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा संभाव्य दुर्घटनेस संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!