“जय जय शंकरच्या गजरात विडणी भक्तिरसात न्हाली! फलटणच्या अध्यात्मिक पत्रकारितेला शंकरभक्तांचा सलाम”!

राजकारण मीडिया: फलटण: दिनांक १०/०६/२०२६: प्रभाकर करचे: फलटण तालुक्यातील विडणी येथील परमपूज्य सद्गुरु शिवाजी महाराज मंदिर परिसर रविवारी (दि. ७ जून २०२६) श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या कृपाछायेत भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. श्री शंकरगीता पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या दिव्य धार्मिक उत्सवात शेकडो भाविकांनी श्रद्धेने सहभाग घेत अध्यात्मिक आनंदाचा लाभ घेतला.

सकाळी श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या पावन पादुकांचे मंदिरात मंगलमय आगमन होताच परिसरात “जय जय शंकर” चा गजर घुमू लागला. यावेळी श्री सद्गुरु शंकर महाराज पादुका, श्री सद्गुरु शिवाजी महाराज समाधी, श्री सद्गुरु कुलकर्णी महाराज (आईसाहेब) मूर्ती तसेच श्री सद्गुरु विठ्ठल महाराज (तात्या) समाधी यांना विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर झालेल्या महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तिभावाने ओतप्रोत भरून गेले.

महाआरतीनंतर श्री शंकरगीता पारायणास प्रारंभ झाला. पारायणातील प्रत्येक अध्याय, नामस्मरण आणि अध्यात्मिक विचारांनी उपस्थित भाविकांना अंतर्मुख केले. मंदिर परिसरात दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि सद्गुरु चरणी समर्पणाची अद्भुत अनुभूती लाभत होती.

पारायण समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत सद्गुरु कृपेचा प्रसाद स्वीकारला. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरला.

विशेष म्हणजे, या अध्यात्मिक उपक्रमाला फलटणमधील पत्रकार बांधवांनी दिलेल्या सकारात्मक प्रसिद्धीमुळे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडून आले. धनकवडी (पुणे) येथील श्री शंकर महाराज मठातील भक्तांनी फलटणच्या पत्रकारांचे विशेष अभिनंदन करत, “अध्यात्मिक पत्रकारिता ही समाजाला संस्कार देणारी शक्ती आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आणि सर्वांचे आभार मानले.

या दिव्य सोहळ्याचे आयोजन श्री मिलिंद कदम (सांगवी, बारामती), श्री निखिल उर्फ बाबूदादा वाघमारे (धनकवडी, पुणे) आणि श्री जयवंत कर्वे (विडणी, फलटण) यांच्या पुढाकाराने करण्यात आले. तसेच व्यासपीठ चालक सौ. उर्मिलाताई निवंगुणे यांच्या सहकार्याने फलटण येथील सद्गुरु हरिबाबा मंदिराचे ओम दत्त ओम चिले भजनी मंडळ, स्वामी समर्थ मंडळ फलटण व सर्व सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

“सद्गुरु चरणी भक्ती, नामस्मरणात शक्ती आणि सेवेतच मुक्ती” या संदेशाने विडणी येथील श्री शंकरगीता पारायण सोहळ्याची भक्तिमय सांगता झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!