राजकारण मीडिया:फलटण : दिनांक: ०१/०३/2026(प्रभाकर करचे): फलटण तालुक्यातील गोखळी गावाच्या हद्दीत नीरा नदीपात्रात तरंगत आढळलेल्या २२ वर्षीय तरुणाच्या मृतदेहामागील रहस्याचा अखेर उलगडा झाला असून, हा अपघाती मृत्यू नसून पूर्वनियोजित खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी चार आरोपींना अटक केली आहे.
मृतदेह सापडला, संशय वाढला
सायंकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आलेला मृतदेह प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला. मात्र डोक्यावर आढळलेल्या जखमा आणि घटनास्थळाच्या परिस्थितीवरून पोलिसांनी संशय व्यक्त केला. तपासादरम्यान मृताची ओळख अंकुश बापू नरबट (रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा) अशी पटली.
माण तालुक्यातील तरुणाचा मृतदेह फलटण तालुक्यातील नदीपात्रात कसा? या प्रश्नाने तपासाची दिशा बदलली आणि गुन्ह्याचे धागेदोरे हाती लागले.
प्रेमाच्या आमिषातून सूडाचा कट
पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली. आरोपींच्या कुटुंबातील एका तरुणीबाबत घडलेल्या कथित गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी प्रतिष्ठेच्या कारणास्तव तक्रार न करता सूड उगवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे समोर आले.
यासाठी संबंधित तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करण्यात आले. त्या माध्यमातून अंकुशला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी त्याला फलटण येथे भेटीसाठी बोलावण्यात आले.
तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर जबरदस्तीने चारचाकीत बसवून पिंप्रद परिसरात दुसऱ्या निर्जनस्थळी नेण्यात आले आणि तेथे त्याचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोखळी हद्दीत नीरा नदीत फेकण्यात आला.
सीसीटीव्ही व तांत्रिक पुराव्यांची साखळी
सुरुवातीला ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी फलटण–दहिवडी मार्गावरील हॉटेल्स, डेअरी व पेट्रोल पंपांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि डिजिटल पुरावे यांच्या आधारे घटनाक्रमाची साखळी जोडण्यात आली. तुटपुंज्या माहितीवरून उभारलेल्या तपासामुळे अखेर गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले.
गुन्हा नोंद, चार आरोपी अटकेत
या प्रकरणी गु.र.नं. 119/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 103(1), 140(1), 238, 61, 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
अविष्कार ज्ञानेश्वर भगत
श्रद्धा अविष्कार भगत
ज्ञानेश्वर भरतराव भगत
अर्चना ज्ञानेश्वर भगत
(सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा)
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई तुषार दोशी (पोलीस अधीक्षक), वैशाली कडुकर (अप्पर पोलीस अधीक्षक) व विशाल खांबे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नितीन चतुरे , अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हनुमंत दडस यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली.
सोशल मीडियाचा गैरवापर किती घातक?
ही घटना केवळ खुनाची नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आखलेल्या गुन्हेगारी कटाचे गंभीर उदाहरण आहे. डिजिटल आमिष, बनावट ओळख आणि सूडाची भावना यांचा संगम किती भीषण परिणाम घडवू शकतो, याचे हे धक्कादायक वास्तव आहे.
फलटण तालुक्यात या घटनेने खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पुढील तपास फलटण ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.
