राजकारण मीडिया: फलटण: दिनांक: ०५/०२/२०२५: प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे नाईक निंबाळकर (राजे गट) यांचे गेली तब्बल 30 वर्षे एकनिष्ठ व कट्टर म्हणून ओळखले जाणारे अलगुडेवाडी गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष नवनाथ करचे व डॉक्टर अक्षय करचे यांनी शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.विडणी (ता. फलटण) येथे माढा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर दादा व फलटण तालुक्याचे आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य सभेमध्ये हा प्रवेश पार पडला.
या सभेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी नवनाथ करचे व डॉ. अक्षय करचे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करताना भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. फलटण तालुक्यात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश असल्याचे विडणी गावचे सरपंच सागर कांतीलाल अभंग यांनी सांगितले.
नवनाथ करचे हे गेली तीन दशके राजे गटासाठी निष्ठेने कार्यरत होते. त्यांनी अलगुडेवाडी गावात अनेक वेळा ग्रामपंचायत निवडणुका जिंकून दिल्या. ते सलग दहा वर्षे तंटामुक्त अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात गावात दारूबंदी राबवण्यात आली तसेच अनेक सामाजिक उपक्रमांतून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आले. त्यामुळे ते फलटण तालुक्यात राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.मात्र नवनाथ करचे व डॉ. अक्षय करचे यांच्या भाजप प्रवेशामुळे राजे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या संपूर्ण फलटण तालुक्यात रंगली आहे.
यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच शिवरूपराजे खर्डेकर यांनी नवनाथ करचे व डॉ. अक्षय करचे यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच विडणी गावचे सरपंच सागर अभंग, पिंपरद गावचे माजी सरपंच तुकाराम ढमाळ व निखिल भैया ढमाळ यांच्या योगदानाचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
