अपघाताचा बनाव फसला; चार तासांत खुनाचा उलगडा करत फलटण ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना केले गजाआड!

मीडिया: फलटण: दिनांक :०७/०१/२०२६: प्रभाकर करचे:फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या हद्दीत लोंढे वस्ती नजीक फलटण–दाते वस्ती रस्त्यावर घडलेल्या कथित अपघातामागील खूनाचा प्रकार फलटण ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणत अवघ्या चार तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.

उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथून गणेश बाळू मदने (वय ४०, रा. सस्तेवाडी, ता. फलटण) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्र. 01/2026, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता तेथे मोठ्या प्रमाणावर रक्ताचे डाग आढळून आले. मात्र मयताची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला साईड-स्टॅण्डवर सुस्थितीत उभी असून तिच्या स्विचमध्ये चावी असल्याचे निदर्शनास आले. ही बाब संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलत सखोल चौकशी सुरू केली.मयताच्या नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत, मयताचे शेतात ससे पकडण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी इसमांशी काही वेळापूर्वी भांडण झाल्याची माहिती मिळाली. घटना मध्यरात्री निर्जन ठिकाणी घडल्याने तांत्रिक पुरावे मर्यादित असतानाही पोलिसांनी गोपनीय माहिती, परिस्थितीजन्य पुरावे व तुटपुंज्या माहितीनुसार तपास करत आरोपींची ओळख पटवली.

त्यानुसार रोहन कैलास पवार (वय २०, रा. सोमवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा) व गणेश शंकर जाधव (वय २२, रा. सोमवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा, मूळ रा. कलीना, कुंची कोरवी गल्ली क्र. ०७, विद्यानगरी, मुंबई–४३००९८) या दोघांना राज्याबाहेर पसार होण्याच्या तयारीत असताना शिताफीने अटक करण्यात आली.

या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. 15/2026, भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 352, 351(2),3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण तसेच पोलीस अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, महादेव पिसे, कल्पेश काशीद, अमोल देशमुख व तुषार नलावडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!