राजकारण मीडिया: दिनांक 29 /12 /2025: प्रभाकर करचे:फलटण नगरपालिकेच्या राजकारणात आज इतिहासाची धूळ उडाली. तब्बल ३५ वर्षे सत्तेच्या खुर्चीला घट्ट चिकटून बसलेली घराणेशाही, अपयशी प्रशासन आणि माजलेला अहंकार फलटणकरांनी एका झटक्यात उलथवून टाकला. लोकांच्या निर्णायक कौलावर शिक्कामोर्तब करत समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार समारंभपूर्वक स्वीकारला आणि फलटणमध्ये नव्या सत्तेचा अधिकृत शंखनाद झाला.
नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेला हा सोहळा म्हणजे केवळ पदग्रहण नव्हते, तर जुन्या सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर लावलेला सार्वजनिक ठपका होता. वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते, पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था, स्वच्छतेचा बोजवारा आणि प्रशासनातील बकालपणा — या साऱ्याचा हिशेब जनतेने या निवडणुकीत चोख घेतला आणि सत्तेचा किल्ला कोसळवला.
घोषणांचा पाऊस, कामांचा दुष्काळ अशी ओळख बनलेल्या जुन्या नेतृत्वाला फलटणकरांनी यावेळी थेट नाकारले. “नगरपालिका म्हणजे कुणाची जहागीर नाही” हा संदेश मतपेटीतून देत जनतेने सत्तेचा माज उतरवला, अशी तीव्र चर्चा शहरभर रंगली आहे.
पदभार स्वीकारताच नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सूचक पण जहाल इशारा देत स्पष्ट केले की, “फलटणचा कारभार आता पारदर्शक, जबाबदार आणि जनतेच्या हिताचा असेल. अपयश, भ्रष्टाचार आणि मक्तेदारीला येथे स्थान नाही.” त्यांच्या या वक्तव्याने ३५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांच्या राजकीय जखमांवर मीठ चोळले असल्याचे बोलले जात आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीने हे स्पष्ट झाले की हे सत्तांतर अपघात नसून नियोजनबद्ध राजकीय लढ्याचा आणि जनतेच्या संतापाचा स्फोटक परिणाम आहे.३५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांसाठी हा निकाल म्हणजे राजकीय अस्तित्वाला बसलेला जबर धक्का आहे, तर नव्या सत्तेसाठी हा कसोटीचा क्षण आहे.
फलटणकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे — सत्ता कायमस्वरूपी नाही, कामच टिकवते!
फलटण नगरपालिकेतील हे सत्तांतर म्हणजे केवळ चेहऱ्यांची अदलाबदल नव्हे, तर “जुनी मक्तेदारी संपली, नवा कारभार सुरू” असा जनतेचा अंतिम फैसला असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
