राजकारण मीडिया: दिनांक 29/ 12/ 2025:फलटण | प्रभाकर करचे:फलटण नगरपरिषदेतील सत्तांतरानंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारा नवनिर्वाचित व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा पदभार स्वीकारण्याचा भव्य समारंभ आज सोमवार, दि. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यामुळे फलटणच्या राजकारणात नव्या पर्वाची अधिकृत सुरुवात होत आहे.
या ऐतिहासिक क्षणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलटण तालुका अध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नगरपरिषदेत ३५ वर्षांनंतर झालेले सत्तांतर आणि त्यानंतर होणारा हा पदग्रहण समारंभ केवळ औपचारिक न राहता, महायुतीच्या राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याची चर्चा आहे. शहर विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, व्यापारी प्रश्न आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर नव्या नगराध्यक्षांकडून ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी, तसेच सर्व नागरिक, व्यापारी, महिला व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
फलटणच्या राजकारणात आजचा दिवस केवळ पदग्रहणाचा नाही, तर सत्तेच्या सूत्रांबरोबरच शहराच्या दिशादर्शक धोरणांचा निर्णायक टप्पा ठरणार आहे—हे निश्चित!
