सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे : नगरपरिषद निवडणुकीचे वारे सुरू असताना शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या गरुड कोयता गैंगवर म्हसवड पोलिसांनी शनिवारी मोठी धडक कारवाई करत दहशत माजवणाऱ्या चार आरोपींना जेरबंद केले. त्यांची गावातून धिंड काढली. सोशल मीडियावर “नायक नाही, खलनायक हु मैं” अशा प्रक्षोभक गाण्यांवर हिंसक रिल्स बनवीत तलवार आणि कोयते फिरवणाऱ्या उत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनु विकास शीलवंत, आर्यन राहुल सरतापे या चार तरुणांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून दणका दिला आहे.या माहितीची खातरजमा होताच गुन्हे प्रकटीकरण पथकासह पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. संभाव्य ठिकाणांवर पाळत ठेवून संशयितांचा पाठलाग करून उत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनु विकास शीलवंत, आर्यन राहुल सरतापे त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून कोयते, तलवारी यांसारखी घातक हत्यारे मिळून आली. सदर कारवाई म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची मानली जाते. सोशल मीडियाद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे आकर्षण, तसेच गॅंगचा विस्तार रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. आरोपींनी “गरुड गैंग” नावाची टोळी तयार करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. ही गैंग अल्पवयीन मुलांना सामील करून त्यांना गुन्हेगारीकडे वळवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे या गैंगचा पूर्ण बिमोड करण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की,सोशल मीडियावर हत्यारे दाखवत व्हिडिओ बनवणे हा गंभीर गुन्हा आहे.अशा रिल्समुळे तरुणांमध्ये चुकीचे आकर्षण निर्माण होते.दहशत निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड करणे बेकायदेशीर असून कठोर कारवाई होऊ शकते तरुण पिढीला आवाहन करत पोलिसांनी सांगितले की, “कुठल्याही प्रकारे गँग कल्चरला खतपाणी घालू नये, कायद्याचे पालन करावे.” ही संपूर्ण कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत – एपीआय अक्षय सोनवणे, पीएसआय अनिल वाघमोडे, मैना हांगे, रूपाली फडतरे, पोलिस कर्मचारी अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, अभिजीत भादुले, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, संतोष काळे, धीरज कवडे, सतीश जाधव, हर्षदा गडदे यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. ताब्यात घेतलेले आरोपीउत्कर्ष भागवत जानकर, सिद्धार्थ किरण रावळ, शंतनु विकास शीलवंत, आर्यन राहुल सरतापे या चौघांना पुढील तपासासाठी ताब्यात ठेवण्यात आले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांची धडक कारवाई
