
सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे
रस्ते अपघातातील जखमींना तातडीने वैद्यद्यकीय मदत व उपचार मिळणे गरजेचे असते. यांकरिता घटनास्थळी असणाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा. आपली ही भूमिका एखाद्याचा प्राणच नव्हे तर विस्कळित होणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना मोठा आधार देणारी ठरू शकते, असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी इंचगाव (ता. मोहोळ) येथे केले.
येथील टोलनाका परिसरात जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर टोलनाका परिसरात वृक्षारोपण, दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप, आरोग्य व नेत्र तपासणी आदी सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, पोलिस निरीक्षक नामदेव शिंद, कामतीचे सहायकइंचगाव (ता. मोहोळ) येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वृक्षारोपण करताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व इतर.पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, उपनिरीक्षक सुखदेव गोदे, महामार्ग प्रोजेक्ट प्रबंधक सत्यनारायण गुर्जर, सुरक्षा प्रबंधक इंस्लेश शर्मा, अनुराग समर्थ, टोळ व्यवस्थापक यतेंद्रसिंह, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, उद्योजक कन्हैया हजारे, दर्याप्पा डोके आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अपघाताचा आलेख कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी विना परवाना, विनाबेल्ट,विनाहेल्मेट, ट्रिपल्सीट, वेगमर्यादा आदी कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व मार्गावर पोलिस यंत्रणा दक्ष ठेवण्यात आली आहे.
शिवाय शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णीनी सांगितले. सूत्रसंचालन अशपाक बागवान यांनी केले.
