
फलटण प्रतिनिधी: फलटण नगरपालिकेने दोन दिवसापूर्वी सुरू केलेल्या अतिक्रमण मोहिमेत तोंडे बघून कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये नगरपालिकेच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.नगरपालिकेच्या हद्दीतील आंबेडकर चौक, डीएड चौक,अहिल्यादेवी चौक, नाना पाटील चौक,बारामती चौक,शिवशक्ती चौक,शंकर मार्केट,गजानन चौक, व इतर भागांमध्ये गेल्या दोन दिवसापासून फलटण नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.कारवाई दरम्यान सुरुवातीला व्यापाऱ्यांनी जाहिराती साठी लावलेले रस्त्यावरील बोर्ड काढण्यास सुरुवात केल्यानंतर रस्त्यावर झालेली इतर अतिक्रमणे काढताना फलटण नगरपालिका तोंडे बघून अतिक्रमण काढत असून बड्या धेंडांच्या अतिक्रमणाला अभय मिळत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये फलटण नगरपालिकेच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहेत.गोरगरीब व्यवसायिकांनी कर्ज काढून केलेले अतिक्रमण काढताना कुठलाही भेदभाव न आणता मोठ्या धेंडांची अतिक्रमण काढणे ही खरी अतिक्रमण मोहीम मानली जाते.
परंतु फलटण नगरपालिकेने तोंडे बघून गोरगरिबांची अतिक्रमणे काढल्यामुळे ही मोहीम केवळ दिखावा असल्याचे जाणवते.सुपर मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून उभारलेल्या संकुलना भवती भाजी विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे नगरपालिकेच्या करदात्या व्यापाऱ्यांच्या दुकानात नागरिकांना रस्त्यावरून पायी जाताना देखील मुश्किल झाले आहे. सुपर मार्केट मध्ये आतील बाजूस भाजी विक्रेत्यांची स्वतंत्र व्यवस्था असताना देखील भाजीविक्रेते रस्त्यावर बसत आहेत.नगरपालिकेने यामध्ये लक्ष घालून रस्त्यावर बसणारी मंडई संकुलनाच्या आतील बाजूस असणाऱ्या मंडईमध्ये बसवण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून व व्यापाऱ्यांमधून होत आहे.
दरम्यान मागील पाच वर्षांपूर्वी फलटण नगरपालिकेने अतिक्रमण मोहीम राबवून जी अतिक्रमणे काढली त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होत असल्याने नगरपालिका अतिक्रमण होते तोपर्यंत का कानाडोळा करते व ती पुन्हा झालेली अतिक्रमणे काढणार का असाही सवाल नागरिक करत आहे.अतिक्रमण मोहिमेमध्ये नगरपालिकेचा दुटप्पीपणा यामध्ये दिसून येत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.