पुणे – “जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी” अशी सिंहगर्जना करणारे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची आज 230 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत आहे. लहुजी वस्ताद यांचे संपूर्ण नाव लहुजी राघोजी साळवे. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद असा त्यांचा नाम उल्लेख केला जातो. क्रांतीगुरु लहुजींचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीतील मांग जातीत झाला. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात होते. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. त्यांच्या या कामगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना “राऊत “पदवी दिली होती.
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद हे दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडे स्वारी, बंदूक चालवणे व निशानबाजी या सर्व युद्धकलेमध्ये निपुण होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मवाळ नव्हे तर जहाल क्रांतिकारक घडवण्याचे काम लहुजी वस्ताद यांनी केले. इसवी सन 1822 मध्ये रास्ता पेठ पुणे येथे लहुजी वस्ताद यांनी तालीम सुरू केली. या तालमीत विविध समाजातील युवक कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल होत होते. यामध्ये बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांती भाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहादुर सदाशिव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील आखाड्यात शिकण्याची नोंद आहे.
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन व विशेष मागासवर्गीय मुला मुलींसाठी शिक्षण देण्याचे काम केले. त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना पुण्यातील काहीजणांनी त्रास देण्याचे काम केले. यावेळी लहुजी वस्ताद यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना संरक्षण पुरवले. आणि सांगितले महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ या लहुजी मांगाशी आहे. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी दिलेल्या संरक्षणामुळे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षण दिले. यामुळे देशात शैक्षणिक क्रांती घडली.
"जगेन तर देशासाठी मरेन पण देशासाठी" या केलेल्या सिंहगर्जनेनुसार क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे हे इंग्रजांविरुद्ध लढलेच परंतु देशांतर्गत मानवजातीच्या विरोधात ज्यांनी काम केलं त्यांच्या विरोधात सुद्धा क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी आपला लढा दिला आहे. या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची प्राणजोत 17 फेब्रुवारी 1881 रोजी मावळली.
